Breaking NewsEditorialMaharashtraState

मैत्री

साधारणपणे नाते म्हटले की आपल्याला आपले घरचे सगेसोयरे किंवा अगदी जवळचे नातेवाईक आठवतात. फार फार तर लांबचे काका, दूरची मावशी अथवा चुलत चुलत भाऊ किंवा बहीण ही नाती आठवतात. लहानपणी हे माझे नातलग ही भावना आपल्या मनात रुजलेली असते आणि ते योग्यच असते, कारण तशी ओळख आपल्याला करुन दिलेली असते. पण या सर्वांपेक्षा एक वेगळे नाते आपण जपत असतो आणि ते म्हणजे मैत्रीचे नाते.

 

शाळेत माझ्या वर्गात असलेला मुलगा म्हणजे मित्र किंवा शेजारच्या वर्गात असलेली मुलगी म्हणजे माझी मैत्रिण ही माफक ओळख आपण इतरांना करुन देत असतो. आपल्याला फक्त त्याचे किंवा तिचे नाव माहीत असते आणि तितकेच आपणासाठी पुरेसे असते. खाऊचा डबा, पेन पेन्सिल शेअर करणे, एकमेकांना वह्यापुस्तके वापरायला देणे किंवा परीक्षेत शिक्षकांची नजर चुकवून त्याला किंवा तिला मदत करणे यातून आपण मैत्री जपत असतो. छोट्या मोठ्या भांडणातून धरलेल्या अबोल्याच्या कट्टीची बट्टी कधी होते ते कळतसुद्धा नाही आणि मैत्री पूर्ववत होते.

 

आपण ज्या चाळीत राहात असतो तिथे मोठ्या मुलांना दादा किंवा मोठ्या मुलीला ताई म्हणायचे, असे जरी आपल्याला सांगितले गेले असले तरी व्यवहार मात्र मैत्रीच्या नात्याचाच असतो. पुढे तरुण वयात कॉलेजमध्ये गेल्यावर मित्र मैत्रिणी विखुरल्या जातात आणि नवीन मैत्री मनात रुजू लागते.

 

नेहेमीच्या बस किंवा ट्रेनने जर रोजचा प्रवास असला तर एकमेकांचे तिकीट काढणे, कॉलेजच्या कॅंटीनमधे चहा पाजणे किंवा एकत्र गृपने सिनेमाला जाणे हे सर्व सुरु होते. आपला फोन नंबर शेअर केलेला असायचा आणि पूर्वी मोबाईल नसलेल्या जमान्यात त्याचा किंवा तिचा फोन आला तर जो आनंद व्हायचा त्याचे वर्णन हे आजकालच्या पिढीला समजणारच नाही. अर्थात घरुन ‘कोणाचा फोन होता ?’ अशी विचारणा व्हायची आणि अभ्यासाच्या नोटसंबंधी काम होते असे सांगितले जायचे किंवा वेळप्रसंगी खोटी थाप मारली जायची. कॉलेज संपता संपता ही मित्रत्वाची नाती काहीवेळा वेगळ्याच नात्यांमधे गुंफली जायची आणि ते एकमेकांचे जीवनसाथी बनायचे.

 

पण खरी मैत्री ही खरोखरच इतकीच असते का हो ?

 

जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी नोकरीला लागतो किंवा नवीन घरात राहायला जातो तेव्हा मित्रत्वाचे नाते खऱ्या अर्थाने समजू लागते. कारण सर्वसाधारणपणे नोकरी आणि घर सहसा बदलले जात नाही. मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या लग्नात अहेर गोळा करण्यापासून ते त्यांना संसारात स्थिर होण्यासाठी मदत करण्यापर्यंत आपण मैत्री निभावत असतो. घरासाठी कर्ज काढायचे असेल साक्षीदार म्हणून हे मैत्रीचे नातेच पाठीशी खंबीरपणे उभे राहाते. जर एखादा मित्र व्यसनाच्या आहारी गेला असेल किंवा वाईट मार्गाला जात असेल तर फक्त मित्रत्वाचेच नाते अशा वेळी खऱ्या अर्थाने मदतीला धावत असते. एखाद्या कुप्रवृत्तीच्या मुलाच्या नादी लागलेल्या मैत्रिणीला सावध करण्याचे काम मैत्री या नात्यांत गुंफलेल्या तिच्या मैत्रिणीच किंवा मित्र करत असतात. वेळप्रसंगी उच्च शिक्षणासाठी हॉस्टेलमधे गेल्यावर तेथील कडक शिस्तीमधे या मैत्रीची हिरवळच मनाला प्रसन्नता देते. जिथे आपण राहात असतो तेव्हा शेजाऱ्याला रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्ये नेताना आपण आपल्यापेक्षा मित्राचा विचार आधी करतो आणि रिक्षा टॅक्सीचे भाडे भरताना हात आपोआप खिशात जातो.

 

मुळात आपल्या देशात अनेक देवदेवता पूजनीय मानल्या गेल्या आहेत आणि त्यानुसार त्यांचे सणवार आपण विशिष्ट दिवसांनुसार साजरे करतो. पाश्चात्य देशात असे अनेक दिवस वेगवेगळ्या नात्यांसाठी साजरे केले जातात. आपल्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा बसल्यावर आपण त्यांचे अनुकरण करण्यास सुरुवात केली.

 

मुळात अमेरिकेतील ज्योसी हॉल या शुभेच्छापत्रे तयार करणाऱ्या एका व्यक्तीने मैत्रीदिनाची संकल्पना प्रथम मांडली. जरी १९१९ सालापासून अमेरीकेत मैत्रीदिनाची सुरुवात झाली असली तरी ते प्रत्यक्षात यायला १९३५ साल उजाडले. या बलाढ्य, श्रीमंत राष्ट्राचे अनुकरण इतर अनेक देशांनी करण्यास सुरुवात केली. पेराग्वे या देशात जन्मलेल्या रॅमन ब्राचो यांनी जागतिक मैत्री संघटना स्थापन केली. त्यांनी ३० जुलै १९५८ पासून जागतिक मैत्री दिन साजरा करण्यास सुरुवात केली. याचा प्रभाव संयुक्त राष्ट्रे किंवा ज्याला आपण युनो म्हणतो त्यांच्यावर पडला आणि ३० एप्रिल २०११ पासून आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्यास सुरुवात केली.

 

पण असे जरी असले तरी विविध देशांत तो वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जाऊ लागला. आपल्या देशात ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा मैत्री दिन या नात्याने साजरा केला जातो.

 

डिजिटल क्रांती झाल्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा देणे हे ओघाने आलेच. पण पूर्वी दिवाळीला, वाढदिवसाला हाताने तयार केलेली शुभेच्छापत्रे मित्रमैत्रिणींना देणे, मैत्री दिनाला प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद एखाद्या हॉटेलात सेलिब्रेट करणे या सर्वांची सर आता खरोखरच या आधुनिक युगातील wishes ना येत नाही. अर्थात काळानुसार बदल हा स्वीकारलाच पाहिजे हे मान्य करायलाच पाहिजे. फेसबुकच्या माध्यमातून तर दूर अंतरावर राहाणाऱ्या अनेक अनोळखी व्यक्ती मैत्रीच्या नात्याने मनाने, विचाराने जवळ येतात. अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींना आपला अगदी मर्यादीत व्यक्तींना माहीत असलेला दुसरा special whatsapp number विश्वासाने शेअर केला जातो.

 

आईवडील, भाऊबहीण, पती, पत्नी या रक्ताच्या आणि पवित्र नात्यांचे महत्व तर अबाधित आहेच पण वेळप्रसंगी या सर्व नात्यांपेक्षाही एक श्रेष्ठ नाते आहे, जे या सर्व नात्यांच्या व्याख्येपलिकडे आहे आणि ते म्हणजे मैत्री, मैत्री आणि मैत्री. आजच्या जागतिक मैत्रीदिनाच्या तुम्हाला अंत:करणापासून शुभेच्छा.

Total Page Visits: 72 - Today Page Visits: 2

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!