इयत्ता नववी व अकरावीचे वर्ग सोमवारपासून होणार सुरू… जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
परभणी, दि. 16 (प्रतिनिधी)
इयत्ता नववी व अकरावीचे वर्ग येत्या सोमवारपासून (दि.21) सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी `प्रतिनिधीशी’ बोलताना दिली. महानगर पालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील शाळांतील दहावी व 12वीचे वर्ग दोन डिसेंबरपासून तर महानगर पालिका क्षेत्रातील दहा डिसेंबरपासून सुरू करण्यात आले. सर्व शाळांनी कोविड-19 बाबत काळजी घेत शाळांना प्रारंभ केला. विशेष म्हणजे पाल्यास शाळेत पाठविण्याबाबत पालकांचे पत्रही शाळांनी घेतले. त्याशिवाय शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरता सॅनिटायझर मशीनची, मास्क आणि दोन विद्यार्थ्यांमध्ये पुरेसे सामाजिक अंतर राखत शाळांनी शैक्षणिक कामकाज सुरू केले. याच पार्श्वभुमीवर आता 21 डिसेंबरपासून म्हणजेच सोमवारपासून इयत्ता नववी व अकरावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी दिले. सर्व शाळांनी कोविड-19च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शाळा सुरूळीत सुरू झाल्या आहेत. इयत्ता दहावी व बारावीचे वर्गांतून विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून येत आहे. शाळांना भेटी देऊन पाहणी केली, विद्यार्थ्यांशी संवादही साधला आहे. याच पार्श्वभूमीवर नववी व अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. शाळांनी सॅनिटायझिंग करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना मास्कबाबत अग्रही ठेवण्यासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. दहावी, व बारावीतील शाळांसह विद्यार्थ्यांचा यास प्रतिसाद मिळत असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहूळ यांनी म्हटले.