State

दृष्टे राष्ट्रपुरुष : डॉ बाबासाहेब आंबेडकर

जगाच्या इतिहासात ज्या – ज्या महामानवांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विविधांगी विषयावर कार्य केले, त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अग्रस्थानी होते. ज्या व्यवस्थेने आयुष्यभर गावकुसाबाहेर जगायला भाग पडले, त्याच व्यवस्थेच्या भल्यासाठी आपलं आयुष्य वेचणारे, जगातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. कसं वागावं, कसं बोलावं, कसं जगावं यासह पिण्याचे पाणी देखील आम्ही सांगितलेच प्यावे हा अट्टाहास तत्कालीन समाजव्यववस्थेचा होता. तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर कधीही मागे हटले नाहीत व खचले नाहीत. आपल्या ६० वर्षाच्या आयुष्यात त्यांनी भारतात समता, बंधुता, प्रस्थापित करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. विशेष म्हणजे त्यात ते यशस्वी देखील झाले. हे फक्त त्यांच्यातील चिकाटी, धैर्य, प्रचंड आत्मविश्वास यांच्यामुळे शक्य झाले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी, आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांनाही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्यांच्या ठायी या लहानपणीच्या सवयीमुळे आढळते. जगद्गुरू तुकाराम महाराज व संत कबीर हे, बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात.
मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे, कला अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले. ज्यावेळी त्यांनी वरील विषयानुसार कार्य करायला सुरवात केली, त्यावेळी त्यांनी कधीही जात – धर्म वा पंथ पहिला नाही. भारतातील ज्या – ज्या लोकामध्ये अज्ञान – अंधश्रद्धा – परंपरा – प्रथा यामुळे मानसिक गुलामगिरी घट्ट झाली होती. ती गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दृष्टे राष्ट्र पुरुष ठरतात.
दिनांक १४ एप्रिल १८९१ ते दिनांक ६ डिसेंबर १९५६ हा सर्व कालावधी भारतीय इतिहासात व्यवस्थेच्या विरोधातील संघर्षांचा कालावधी आणि भारतीय समाजमनात क्रांतीच्या दृष्टिकोनातून खूपच चैतन्याचा काळ म्हणायला हरकत नाही. विद्यार्थी दशेत असतानापासून ते अगदी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही भारताशी व भारतीय लोकांशी प्रतारणा केली नाही. उलट त्यांना जेंव्हा – जेंव्हा संधी मिळत गेली तेंव्हा – तेंव्हा त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर राष्ट्रनिर्माणाचे कार्य केले. हे कार्य करताना त्यांनी कधीही ठराविक वर्ग पाहिला नाही वा ठराविक समाज. तर त्यांच्या त्या कार्यात अखंड राष्ट्राचे हित सामावले होते. म्हणूनच आज ६ डिसेंबर रोजी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक दृष्टे राष्ट्रपुरुष होते हे समजून घेणे गरजेचे आहे.
भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी भारतातील अतिश्रीमंत वा अत्यंत गरीब व्यक्तीला स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय इत्यादी गोष्टी मिळवून देण्याचे कसब दाखवून दिले. मग त्यामध्ये मतदानाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अन्यायाविरोधात लढण्याचा अधिकार, स्वतःचे हक्क, कर्तव्याची जाणीव हे सर्व सर्वांना समान पातळीवर प्राप्त करून दिले. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जगातील उत्कृष्ट घटना तयार केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आतापर्यंत भारतीय राज्यघटनेत जवळपास १०० च्यावर दुरुस्त्या झाल्या पण भारतीय राज्यघटनेचे महत्व कमी झाले नाही वा कुणाच्या हक्कावर गदा आली नाही किंवा त्या घटनेचा आधार वा गैरफायदा घेऊन कुणीही वरचढ ठरले नाही. सर्वांनाच समान अधिकार या घटनेने दिला आहे.
कुटुंबसंस्थेचा खरा आधारस्तंभ हा स्त्रीवर्ग असतो. याची जाण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना होती. म्हणून त्यांनी महिलांना हक्काचे आणि त्यांच्या स्वातंत्र्याला उजाळा देणारे हिंदू कोड बिल आणले. हे हिंदू कोड बिल हे फक्त ठराविक वर्गातील स्त्रियांसाठी नव्हते, तर ते समस्त भारतीय महिला वर्गासाठी होते. हे विधेयक मंजूर झाले नाही हे भारतातील स्त्रियांचे दुर्दैव. पण त्यासाठी बाबासाहेबांनी केलेले प्रयत्न खुप मोठे आणि प्रामाणिक होते. ज्यामुळे भारतातील स्त्रियांना जगण्याचा मार्ग सुकर होऊन त्यांना एक नवी दिशा मिळाली असती.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे मूळ हे शेतीत आहे. त्यामुळे शेती अर्थातच शेतकरी हे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. नुसते मांडले नाहीत, तर त्यानुसार त्यांनी नियोजन देखील शासनाच्या समोर मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजन हे अतिशय उत्तम आणि चपखल होते. म्हणूनच त्यांनी १९१८ मध्ये small holding in india and their remedies ह्या प्रबंधातून भविष्यात शेतीला काय – काय आव्हाने असू शकतील, आणि त्यावर काय – काय उपाययोजना कराव्या लागतील याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार त्यांनी सांगितले की, शेतीला जोडधंद्याची सांगड घातली पाहिजे, सतत वीजपुरवठा, पाण्याचे नियोजन केले पाहिजे. खोतीपद्धती बंद करून शेती सगळयासाठी उपलब्ध केली पाहिजे. एवढेच नव्हे तर शेतीमालाला हमीभाव दिला पाहिजे, तरच शेतकरी जगू शकतो हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले. पाण्याचे, विजेचे, जोडधंद्याचे नियोजन झाले नाही तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे हाल होतील, त्यासोबतच शेतीचे तुकडे करू नये अन्यथा भारतात भविष्यात शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करतील. असा इशारा त्यांनी आजपासून १०० वर्षांपूर्वी दिला होता. पण राजकीय आकसापोटी त्यांच्या सूचना अंमलात आणल्या गेल्या नाहीत. त्याचे परिणाम आजही भारतीय शेतकरी भोगत आहे. ही पंचसूत्री जर तत्कालीन व्यवस्थेने वापरली असती तर आज सात बारा कोरा करणार, कर्जमाफी करणार इत्यादी घोषणांची आवश्यकता भासली नसती. पण तसे झाले नाही, हे मात्र वास्तव.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दृष्ट्येपणाचे अजून एक महत्वाचे उदाहरण सांगता येईल. ते म्हणजे भारताची अंतर्गत आणि बाहेरील सुरक्षा व्यवस्था विषयक केलेली उपाययोजना. भारताच्या तिन्ही बाजूने शत्रू राष्ट्रांचा वेढा आहे. त्यामुळे ऐनवेळी मदत म्हणून दोन राजधानींची शिफारस केली होती. एक म्हणजे नवी दिल्ली आणि दुसरी म्हणजे हैदराबाद. जेणेकरून दक्षिण व उत्तर भारत हा संबंध सुरळीत तथा सुरक्षित राहील. कारण कारभार कमी – अधिक प्रमाणात दोन्ही ठिकाणाहून झाल्यामुळे एकसंघता राहायला मदत मिळेल. त्यासोबतच भारतात असणारे विविध धर्म, असंख्य जाती, अनेक पंथ आहेत, तरीही भारत आजही एकसंघ आहे. त्याचे कारण भारतीय संविधान. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात अशा विघातक संघटना डोके वर काढू नयेत यास्तव राष्ट्र्रपती राजवटीचे अत्यंत महत्त्वाचे अणि सुरक्षिततेचे कलम राखून ठेवले आहे. तसेच भारतीय लष्करी सामर्थ्य वाढवायचे असेल तर त्यासाठी भारताने तिन्ही आघाडयावर सक्षम बनले पाहिजे. त्यावेळी त्यांनी केलेल्या सुचना वा नोंदी जर तत्कालीन व्यवस्थेने मान्य केल्या असत्या वा त्यानुसार कार्यवाही केली असती तर कदाचित आज राफेल किंवा बोफोर्स सारख्या प्रकरणांची चर्चा जगभर गाजली नसती.
आजही भारतातील एक वर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ठराविक वर्गाचा शिक्का मारतो जो अत्यंत चुकीचा आहे. सोबतच त्यांच्या या व अशा असंख्य राष्ट्रप्रेमी कामावर अन्याय करण्यासारखे आहे. कारण त्यांच्या कामात एवढी पारदर्शकता आणि प्रवाहिपणा होता की, त्या कामातून खऱ्या अर्थाने लोकांच्या दृष्टीने उपयुक्तता सिद्ध होत असे. जेव्हा १९४२ मध्ये ते पाटबंधारे आणि ऊर्जा विभागासह मजुरमंत्री झाले. मजुरमंत्रीपदाची काही वर्षे ही भारताच्या विकासाच्या पायभारणीच्या दृष्टिकोनातुन अत्यंत महत्वाची आहेत. याच काळात बाबासाहेबांनी ज्या – ज्या नद्यांना पूर येतो, त्या – त्या नद्यांना धरणे बांधण्याची संकल्पना मांडली. एवढेच नव्हे तर ते फक्त पाणी अडविण्यापेक्षा त्याचा उपयोग हा शेतीसाठी, ऊर्जानिर्मितीसाठी आणि वाहतुकीसाठी करण्यात यावा जेणेकरून त्या पाण्याचा अपव्यय होणार नाही आणि त्यातूनच भारतातील अनेक प्रकल्पांची उभारणी करण्यात आली. त्यामध्ये दामोदर खोरे योजना, महानदी खोरे योजना, हिराकुंड प्रकल्प, सोननदी खोरे प्रकल्प अशा एकूण आठ धरणांच बांधकाम त्यांनी अवघ्या चार वर्षात पूर्ण केलं. तुंगभद्रा, भाक्रा – नांगल धरण त्यांच्याच प्रयत्नातून आणि दूरदृष्टीतून बांधण्यात आले. त्यासोबतच लोकांना शिस्त लागावी, वापर योग्य व्हावा यासाठी त्यांनीच देशात प्रथम केंद्रीय उर्जा आयोगाची स्थापना केली. नद्यांवरील धरणं बांधण्यासाठी आणि सिंचनासाठी नद्यांच्या खोऱ्यातील पाण्याचा वापर कसा करता येईल यासाठी एक आयोग नेमून भारताच्या उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ बाबासाहेबांनी रोवली. भारताच्या काही भागात महापूराने आणि काही भागात दुष्काळाने हाहाकार उडतो. त्याच्यावरही या दुरदृष्टीच्या महामानवाने एक पर्याय सुचवला. तो म्हणजे नद्याजोड प्रकल्प. ज्याठिकाणी पावसाच्या महापुरने लोकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे त्याठिकाणी महापूर येणार नाहीत आणि ज्या ठिकाणी दुष्काळ पडणार आहे त्याठिकाणी दुष्काळाच्या झळा पोहचणार नाहीत. त्यावेळी हा प्रकल्प होऊ शकला नाही, का ते इतिहासलाच माहीत? मात्र आता यावर खूप मोठ्या प्रमाणावर काम सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारणं ती काळाची गरज आहे. आणि जर हा प्रकल्प झाल्यास, तर पुन्हा एकदा सगळं जग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुरदृष्टीचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जेंव्हा मजुरमंत्री होते तेंव्हा त्यांनी अनेक योजना कामगारांच्या हितासाठी सुरू केल्या. ज्या आजही उपयोगाच्या आहेत. त्यासोबतच त्यानी यादरम्यान केलेल्या अनेक कायद्यामुळे कामगारांची मानहानी थांबत त्यांच्या पिळवणुकीला आळा बसला. खाण कामगार, शेती कामगार, घरकामागर, वेगवेगळ्या विभागात काम करणारे कामगार, खाजगी शासकीय वा निमशासकीय क्षेत्रात काम करणारे कामगार यांचा सर्वांचा विचार करून त्यांनी सुधारणा सुचवल्या. समवेत महिला कामगारांचे प्रश्न, त्यांच्या प्रसूती काळातील रजा, त्यांच्या कामाच्या तासात कपात इत्यादी बाबीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लक्ष वेधत त्या – त्या क्षेत्रात सूट मिळवून दिली.
ज्याप्रमाणे सामाजिक क्षेत्रात न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र काम केले. त्याच प्रमाणे त्यांनी शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात खूप मोठे बदल घडवून आणले. आजच्या अनेक आर्थिक विषयांचा समावेश त्यांनी त्या वेळी आपल्या लिखाणात केला होता. आता ती धोरणं किती वापरली जातात हा त्या – त्या सरकारचा प्रश्न आहे. पण त्यांनी मांडलेल्या आर्थिक सुचनांच्या अभ्यासावार खुप मोठे अभ्यासपूर्ण लिखाण केले गेले आहे. अनेक परदेशी विद्यापीठात त्यांचे प्रबंध हे संदर्भासाठी वापरले जातात. जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ म्हणून त्यांची ख्याती त्यावेळी देखील होती आणि आजही आहे.
या सर्व बाबींबरोबर या देशात निर्माण झालेले विविध क्षेत्रातील स्त्रियांचे, कानाकोपऱ्यात असणाऱ्या अल्पसंख्याकांचे, शेतमजुरांचे, शेतीचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, विजेचे, देशाच्या आर्थिकनीतीचे, बीजारोपण बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने झाले आहे. त्यांच्या आर्थिक तत्वज्ञानातून भारतीय पैशाचे मूल्य निर्धारित झाले, जीवन विमा सुरु करण्याचे पहिले काम बाबासाहेबांनीच केले आणि त्याचा लाभही कर्मचाऱ्यांना मिळवून दिला, त्याठिकाणी पाहिले नाही की हा कर्मचारी कोणत्या वर्गाचा वा कोणत्या जातीत जन्मला, त्यापेक्षा तो भारतीय आहे ना मग झाले. भारतात प्रशासन प्रणालीचे, विविध स्तरातील भाषावादाचे, फाळणीचे सर्व प्रश्नांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सखोल चिंतन देशाच्या आधुनिक जडणघडणीच्या बांधणीचे मूलमंत्र ठरले. शिक्षण घेऊन नोकरीअभावी असणाऱ्या बेरोजगारांना बेकारभत्ता, सर्व स्तरातील वृद्धांना पेन्शन व एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज कार्यालयांची निर्मिती ही बाबासाहेबांचीच देणगी आहे. एवढेच नव्हे तर निवृत्तांना पेन्शन, भविष्य निर्वाह निधी, मजूरांना किमान वेतन, अकाली मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत ही धोरणेही बाबासाहेबांच्या चिंतनातून आलेल्या विचारांचे आणि कृतीचे फळ आहे. यासाठी त्यांनी कायदे केले. त्या कायद्याच्या आधारे आजही भारताचा कार्यभार चालतो.
म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे महनीय कार्य पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका वर्गापूरते मर्यादित होते, पण वरील माहिती पाहता त्यांचे राष्ट्रप्रति असणारे प्रेम आणि निष्ठा दिसून येते. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये दूरदृष्टीपण दिसून येते. भविष्यात भारताला काय – काय अडचणी येऊ शकतात ते दृष्टेपण समजून येई.
त्यांना एकदा इंग्रज सरकारने विचारले की, “तुमचे आणि भारतातील राजकिय नेतृत्वाचे पटत नाही, अशावेळी तुम्ही जर आमच्या बाजूने येत असाल तर आम्ही तुमच्या मागण्यांना पाठींबा देऊ.” जर त्यांनी मनात आणले असते तर त्यांना हे शक्य होते, परंतु या महामानवाने तात्काळ नकार देत “माझे आणि माझ्या देशातील राजकिय नेतृत्वाचे संबंध याबाबतीत आम्ही निर्णय घेऊ, तुम्ही आमच्यात नाक खुपसू नका. कारण प्रथमतः आणि अंतिमतः मी भारतीय आहे” असे ठणकावले. या प्रसंगातून त्यांचे भारत आणि भारतीय यांच्याशी त्यांची असणारी जवळीक दिसून येते.
म्हणून आज भारताचे नाव जगात आदराने घेत जात असेल तर त्यामागे नक्कीच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान हे राष्ट्रनिर्माणाचे होते हे मान्य करावेच लागेल. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरयुक्त अभिवादन

श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर,
मु. पो. वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी
संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४

Total Page Visits: 104 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!