दामिनीने थांबवला बालविवाह; पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांची कारवाई

टेंभुर्णी प्रतिनिधी
जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील एका किशोरवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात दामिनी पथकाच्या सतर्कतेमुळे यश आले आहे. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना या विवाहाबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कारवाई करुन हा बालविवाह थांबवला आहे.
याबाबत सविस्तर असे की, टेंभुर्णी ता. जाफ्राबाद येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय किशोरवयीन मुलीचा विवाह २७ नोव्हेंबर रोजी एका २८ वर्षाच्या तरुणाशी ठरवण्यात आला होता.
परंतु सदरील मुलीला हा बालविवाह मंजुर नसल्याने तीने १० नोव्हेंबर रोजी स्वत: पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना फोन केला. आई वडील व नातेवाईक तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या युवकाशी २७ नोव्हेंबर रोजी लग्न लाऊन देणार असल्याची माहिती तीने दिली.
त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी पथकासह टेंभुर्णी येथील मुलीचे घर गाठले. आई वडिलांसह लग्न ठरलेल्या मुलाचेही समुपदेशन केले. आणि हा बालविवाह न करण्याची ताकिद दिली.
दि. २७ तारखेला सकाळी पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांनी सदर मुलीला फोन द्वारे सर्व ठिक आहे की नाही याची विचारणा केली असता तीने समाधान व्यक्त केले की, मी मामाच्या घरी आहे. माझं लग्न थांबवून तुम्ही मला वाचवलं आहे.अशा प्रकारे जाधव यांच्या तत्परतेमुळे प्रतिबंधात्मक कारवाई करुन हा बालविवाह टाळण्यास पोलीसांना यश आले आहे.