तर असा आहे ‘आपली आजी’चा 6 महिन्यात 6 लाखांचा प्रवास!

अगदी छोटा कॅमेरा, आज्जी आणि त्यांचा नातू. या त्रिकुटाने एका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अवघ्या सहा महिन्यात 6 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठला आहे. आज त्यांची दखल अनेक माध्यम घेत आहे. मात्र त्यांचा हा प्रवास आणि त्यामागची कहाणी म्हणावी तितकी समोर आलेली नाही. त्यासाठी थेट आजींसोबत मुलाखतींच्या माध्यमातून भेटणे झाले. त्याचा काही अंश आपल्यासाठी….
‘आपली आजी’ यूट्यूब चॅनलवर अतिशय गोड आवाजात ‘नमस्कार बाळांनो…’ म्हणणाऱ्या सुमन धामणे आज्जी अहमदनगरपासून (महाराष्ट्र) 15 कि.मी. अंतरावर असलेल्या सारोळा कासार गावच्या. त्यांचा नातू यशच्या एक आग्रहास्तव सुरु झालेला हा प्रवास आज देश-विदेशात चर्चेचा विषय ठरत आहे.
आजींनी सांगितले कि, कॅमेरा, यूट्यूब, कमेंट असे कित्येक शब्द मी फारसे कधी ऐकले नव्हते. मात्र आज ते माझ्या जीवनाचे अविभाज्य भाग बनून गेले आहेत. दरम्यान लोकांच्या कमेंट्स, वाचकांचे फोन तसेच त्यांच्या जीवनात झालेला बदल सांगतानाचा आनंद आजींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. यावेळी यशने तांत्रिक गोष्टीची हाताळणी तसेच संपूर्ण कामाचे स्वरूप सांगितल्यानंतर त्याची दुर्दम्य इच्छशक्ती, विवेकबुद्धी दिसली.
6 महिन्यात सामान्य ते सेलेब्रिटी : आज आज्जी फिरायला गेल्या कि, लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा आग्रह करतात. ठिक-ठिकाणी मान, सन्मान दिला जातो. सहा महिन्यात घडलेला हा चमत्कार सांगताना आजींना अक्षरशः भरून आलं होतं.
पारंपारिक खाद्यपदार्थांना पसंती : पावभाजीपासून सुरु झालेला हा प्रवास आज वाचकांच्या आवडत्या रेसिपी बनवण्यापर्यंत पोहोचला आहे. कारल्याची भाजी, गावरान भाज्या, शेंगदाणा चटणी, हिरव्या भाज्या, महाराष्ट्रीयन गोड पदार्थ, वांगी आणि इतर पारंपारिक खाद्यपदार्थ चॅनलवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे त्यांना लाखांमध्ये व्हीव्हज आहेत.
व्यस्त म्हणूनच मस्त : सुमन धामणे सांगतात, लोक म्हणतात तुमच्या घरचे भाग्यवान आहेत. कारण त्यांना माझ्या हातचं सर्व काही खायला मिळते. यावेळी आजींनी त्यांची दिनचर्या सांगितली. यावरून त्यांचा साधेपणा आणि त्यांची व्यस्तता लक्षात येईल. आजी रोज सकाळी 4.30 वाजता उठतात. त्यानंतर फिरायला जाणे, घरातील स्वच्छता करणे, पतीचे सर्व काही आवरणे, स्वयंपाक करणे मग मळ्यात जाणे. एवढ्या व्यस्त दिनचर्येतून त्या शुटिंगसाठी वेळ काढतात.
चॅनेल हॅक अन् रात्रीची झोप उडाली! : यशने सांगितलं की, ऑक्टोबर महिन्यात चॅनल हॅक झाल्यावर आम्हाला मोठा धक्का बसला. सर्वांची झोप उडाली. यावेळी आजींची दिल्लीत राहणारी एका नात मदतीला धावली. दुसरीकडे यशची सुरु असणारी मेहनत देखील सफल झाली आणि चार दिवसात चॅनल पूर्ववत झाले.
नावाप्रमाणेच आहे ‘यश’चा प्रवास : आजींचा नातू यश म्हणजे नावाला साजेस व्यक्तिमत्व. 7वी असताना त्याने पहिल्यांदा यूट्यूब चॅनेल सुरु केले. तंत्रज्ञानाशी निगडित ते चॅनेल होते. तो वारसा तो आजही जपत असून त्याच्या वैयिक्तक यूट्यूब चॅनेलला लाखो सबस्क्रायबर्स आहेत. यशाच्या शिखरावर पोहोचूनही हुरळून न जाता ‘यश’ ची सुरु असणारी ही धडपड वाखण्याजोगी अशीच आहे. सध्या 11वी त शिकणारा यश लवकरच स्वतःचा स्टुडिओ सुरु करत आहे. त्याला आगामी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात!
यूट्यूब नव्हे यूट्यूब फॅमिली : सुमन आज्जी आणि यशचे यूट्यूब चॅनेल आहे हे आता सर्व सर्वश्रुत झाले आहेच. मात्र यशच्या आईचे देखील एक यूट्यूब चॅनेल आहे त्याला देखील लाखो सबस्क्रायबर्स आहेत. एकंदरीत सांगायचे झाले तर त्यांची फॅमिली यूट्यूब फॅमिली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अमेरिका ते अहमदाबादपर्यंत पोहोचले मसाले : ‘आपली आजी’ हे यूट्यूब चॅनेल लोकप्रिय व्हायला लागले आणि लोक आजींना याविषयी विचारणा करू लागले. तुम्ही कोणते मसाले वापरता? आम्हाला मसाले मिळतील का? या आग्रहातून आजी आणि यशाने विचार केला आणि पारंपरिक मसाले विकण्यास सुरुवात झाली. आज या मसाल्याची मागणी पाहता तुम्हाला लोकप्रियतेचा अंदाज येईल. जम्मू-काश्मीर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अहमदाबाद, तामिळनाडू, पुणे तसेच मुंबई सारख्या शहरातून प्रचंड मागणी होत आहे. सध्या दोनच प्रकारचे मसाले ते पुरवत असले तरी लवकरच त्यात अजून भर पडणार असल्याचे आजींचा नातू यशने सांगितले.