दोन तरुणांचा विहीरीत पडून मृत्यू

जालना प्रतिनिधी
बदनापूर तालुक्यातील कुसळी येथे शेतीला पाणी भरण्यासाठी विहिरीतील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या दोन अठरा वर्षीय आते-मामेभावांचा विजेचा धक्का लागून विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे कुसळी गावात शोककळा पसरली आहे. सदरील विहीर काठोकाठ भरलेली असल्यामुळे बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आलेले असून उशिरापर्यंत शोधकार्य सुरूच होते.
तालुक्यातील कुसळी येथे हा प्रकार घडला येथील गट क्रमांक 93 मधील विहिरीला काठोकाठ भरून पाणी होते. मोटार सुरू करून शेतीला पाणी सोडण्यासाठी प्रदीप कैलास वैद्य (वय 18, रा. कुसळी) व गणेश कृष्णा तर्डे (वय 18, अंबड) हे दोघे आते-मामे भाऊ आज (दि. 21 नोव्हेंबर) दुपारी 2 वाजेच्या सुमारास विहिरीकडे गेले हेाते. सिंचनासाठी मोटार चालू करण्यासाठी हे गेले असता मोटार सुरू होऊनही पाणी येत नसल्यामुळे दोघे विहिरीत जाऊन पाईप लिकीज तर नाही हे तपासत असतानाच अचानक विद्युत प्रवाह सुरू होऊन त्याचा धक्का या दोघांना बसला. विशेष म्हणजे गणेश कृष्णा तायडे हा तरुण दिवाळीनिमित्त मामाच्या गावाला आलेला होता. ही विहिर जवळपास 80 फूट खोल असून सध्या ती काठोकाठ भरलेली आहे.
विद्युत मोटार सुरू करताना अचानक पाईपमध्ये विजप्रवाह होऊन विजेचा झटका बसून ते पाण्यात फेकल्या गेल्यामुळे तोल जाऊन दोघांचाही बुडून मृत्यू झाला असल्याचे कुसळीचे गावकरी सांगतात. त्यानंतर उपस्थित प्रथमदर्शींनी तात्काळ विहिरीतील पाईप ओढून बाहेर काढले. सदरील घटनेची माहिती कुसळी गावात समजताच गावकऱ्यांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली या विहिरीत जवळपास 75 ते 70 फूट पाणी असल्यामुळे दोघेही मिळून आले नाहीत. गावकऱ्यांनी गळ टाकून सदरील तरुणांचा विहिरीत शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला.