शॉक लागून तीन सख्ख्या भावाचा दुर्दैवी मृत्यू

जालना प्रतिनिधी
दिवसभर वीजपुरवठा राहत नसल्यामुळे काल बुधवारी रात्री भोकरदन तालुक्यातील पळसखेडा (पिंपळे) येथील ज्ञानेश्वर जाधव (27), रामेश्वर जाधव (25) आणि सुनील जाधव (18) हे सख्खे बंधू गट नं. 9 मधील शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. विद्युत मोटार सुरू करीत असतांना सर्वात मोठा भाऊ ज्ञानेश्वर जाधव हा विजेचा शॉक लागल्यामुळे तुडुंब भरलेल्या विहिरीत पडला.अचानक घडलेल्या या घटनेमुळे मदतीसाठी धावलेल्या रामेश्वर जाधव आणि सुनील जाधव यांनाही विजेचा जोरदार शॉक लागल्याने तेही विहिरीत पडले. विहिरीतही करंट उतरल्यामुळे या तीनही भावाचा दुर्दैवी अंत झाला आहे. रात्री उशिरा घटना घडल्यामुळे परिसरात कोणीही नसल्यामुळे घटना समजण्यास उशीर झाला होता. घटनेची माहिती कळताच भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांच्यासह हसनाबादचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष घोडके, सहायक फौजदार देशमुख, पोहेकाँ. विष्णू बुनगे, भापकर आदींनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले.हे रामस्थांच्या मदतीने चारपायी बाजेच्या साह्याने या तीन भावाचे मृतदेह विहिरीतून आज सकाळी काही वेळापूर्वी बाहेर काढण्यात आले आहेत. राजूर येथील आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हलविण्यात येणार आहे. एकाच घरातील तीन भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे पळसखेडा गावात सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. सर्वात मोठ्या भावाचे लग्न झालेले होते तर लहान दोघे भाऊ अविवाहित होते.